पुणे : पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराने एकावर कोयत्याने वार करून दहशत माजविल्याची घटना शिवाजीनगर भागातील कामगार वसाहत परिसरात घडली. या प्रकरणी सराइतास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
काका रामचंद्र शिरोळे (वय ४३, रा. भोई आळी, कसबा पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तुषार कैलास काकडे (वय १९, रा. शिंदे वस्ती, एसआरए वसाहत, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. शिरोळे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरोळे आणि आरोपी ओळखीचे आहेत. काकडेने शिरोळे यांच्या मुलाला मारहाण केली होती. याबाबत शिरोळे आणि त्यांच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार केली होती.
हेही वाचा – पुणे: भरधाव टेम्पोच्या धडकेने दहा महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू
हेही वाचा – पुणे: मंचरमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, १७ जणांवर जीवघेणे हल्ले
पोलिसांकडे तक्रार दिल्याने काकडे शिरोळे यांच्यावर चिडला होता. शिरोळे कामगार पुतळा वसाहत परिसरात थांबले होते. त्या वेळी काकडेने शिरोळेंवर कोयत्याने वार केले. कोयता हवेत उगारून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक अरविंद म्हस्के तपास करत आहेत.