पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत असलेल्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे, यासाठी दीड वर्षांपासून हेलपाटे मारणाऱ्या महिलेला उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन येताच अवघ्या चार दिवसांत महापालिकेत नोकरी मिळाली.
महिलेने उपमुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव आणि महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याशी संपर्क साधून कैफियत मांडली. परदेशी यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला अन् अवघ्या चार दिवसांत महिलेला पालिकेतील नोकरीचा आदेश मिळाला.
हेही वाचा – पुण्यात आज हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट संदेश
पूजा कृष्णाजी भोसले असे नोकरी मिळालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती कृष्णाजी भोसले हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात वाहनचालक या पदावर कार्यरत होते. त्यांचे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वानुसार नियुक्ती मिळावी म्हणून त्यांची पत्नी पूजा भोसले यांनी १७ जानेवारी २०२२ रोजी प्रशासनाकडे अर्ज केला; पण पालिका सेवेतच असणाऱ्या त्यांच्या एका नातेवाईकाने वारस नोंदीवरून खोडा घातला. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. पतीच्या मृत्यूनंतर पूजा भोसले यांना पाच आणि आठ वर्षांच्या दोन मुलींचा सांभाळ करणे जिकिरीचे जात होते.
कृष्णाजी भोसले हे पालिका सेवेत असताना तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होते. सध्या डॉ. परदेशी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. दीड वर्षांपासून झगडूनही नोकरी मिळत नसल्याने अखेर पूजा भोसले यांनी डॉ. परदेशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कैफियत मांडली. डॉ. परदेशी यांनी १५ मे २०२३ रोजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कानावर हा विषय घातला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आयुक्त सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना पूजा भोसले यांच्या नियुक्तीची प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या. पूजा यांचा पोलीस पडताळणी अहवाल, वैद्यकीय तपासणी करून तात्काळ अहवाल देण्यात आला. चौथ्या दिवशी म्हणजे १९ मे रोजी पूजा यांना महापालिकेत शिपाई या पदावर नियुक्ती देण्याचा आदेश आयुक्त सिंह यांनी काढला.
हेही वाचा – ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड आता ‘मार्गावर’; पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार
पतीच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठी गेली दीड वर्ष संघर्ष केला. दोन मुलींचा सांभाळ, घरखर्च करणे कठीण झाले होते. डॉ. श्रीकर परदेशी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अवघ्या चार दिवसांत नोकरी मिळाली. त्याबद्दल त्यांचे आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानते. – पूजा भोसले