व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला.
याबाबत आकाश दीप संधू (वय ४७, रा. महंमदवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुीसार अनोळखी मोबाईलधारक तसेच बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश खासगी विमान कंपनीत वैमानिक आहेत. त्यांना व्यवसायात गुंतवणूक करायची होती. संकेतस्थळावर त्यांनी गुंतवणूक योजनांविषयी माहिती घेतली होती.
तेथे त्यांना टोन इमिको क्लब या कंपनीच्या योजनेविषयी माहिती मिळाली. रेडवाईन तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री तयार करण्यात येत असल्याची बतावणी चोरट्यांकडून त्यांच्याकडे करण्यात आली होती. या व्यवसायाची साखळी संपूर्ण देशभरात पसरली असून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. गुंतवणूक योजनेबाबतची बनावट कागदपत्रे चोरट्यांनी त्यांना पाठविली. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात १६ लाख ६२ हजार रुपये जमा केले. संधू यांना कोणताही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत आहेत.