पुणे : संशयास्पदरित्या थांबलेल्या मोटारीमधील तिघांकडे गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याने चौकशी केल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची घटना कोंढवा परिसरातील महंमदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी तीनजणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा – नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार एक गंभीर जखमी
हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
मितेश संजय परदेशी (वय ३२, रा. जगताप नगर, वानवडी), मनीष जयप्रकाश मेहता (वय ३६, रा. दापोली, जि. रत्नागिरी), सुमीत राजेश परदेशी (वय ३६, रा. शांतीनगर, वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई रोहित पाटील यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मध्यरात्री महंमदवाडीतील रहेजा प्राईम इमारतीजवळ मोटार थांबली होती. रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस शिपाई रोहित पाटील यांना संशय आला. मोटारीतील तिघांची त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा मनीष मेहताने अरेरावी करण्यास सुरुवात केली. तुला माहीत आहे का ? आम्ही कोण आहोत, असे सांगून त्याने पोलीस शिपाई पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुुरुवात केली. तिघांनी पाटील यांना पकडून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक चोरगल तपास करत आहेत.