पुणे : सिंहगड एक्सप्रेसमधून एक तरुण शाळकरी मुलीला घेऊन निघाला होता. आठ वर्षांची मुलगी शाळेच्या गणवेशात होती. रेल्वेतून पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे प्रवास करत होते. तरुणाच्या संशयास्पद हालचाली त्यांनी टिपल्या. ननावरे यांनी त्वरित चौकशी सुरू केली. तेव्हा शाळकरी मुलीचे तरुणाने अपहरण केल्याची माहिती मिळाली. ननावरे यांनी तरुणाला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देऊन आठ वर्षांच्या मुलीची सुखरुप सुटका केली.
सहायक निरीक्षक ननावरे न्यायालयीन कामकाजासाठी मुंबई उच्च न्यायालायात गेले होते. त्यांची उच्च न्यायालयात एका प्रकरणात साक्ष होती. सिंहगड एक्सप्रेसने गुरुवारी (८ फेब्रुवारी) ते पुण्याकडे निघाले होते. ३० वर्षांचा एक तरूण आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला घेऊन डब्यात शिरला. तरुण तिच्याशी हिंदीत बोलत होता. मुलगी मराठीत बोलत होती. तरुणाने मुलीला खाऊ आणून दिला होता. याच डब्यातून प्रवास करणारे ननावरे यांनी तरुणाच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. ननावरे साध्या वेशात होते. त्यामुळे तरुणाला संशय आला नाही. त्यांनी तरुणाशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने मुलीचा भाऊ असल्याचे सांगितले. प्रवासादरम्यान त्यांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा तिने ती मूळची वसईची असल्याचे सांगितले. कुटुंबीयांना न सांगता घरातून बाहेर पडल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा…निर्भय सभेच्या आयोजकांसह भाजप, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे
त्याचवेळी आरोपी तरुणाने मुलीला डोळ्याने खुणावले. काही माहिती देऊ नको, असे सांगितले. ननावरे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेतले. तिच्या मामाचा मोबाइल क्रमांक घेतला. ननावरे यांनी मोबाइलवरुन मुलीचे छायाचित्र काढले आणि मामाला पाठविले. ननावरे यांनी त्वरीत पुणे पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलिसांचे पथक पोहोचले. ननावरे यांनी तरुणाला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा…बाणेर भागात सराफी व्यावसायिकाची मित्रावर गोळीबार करून आत्महत्या; जखमीची प्रकृती चिंताजनक
चौकशीत त्या तरुणाचे नाव दयानंदकुमार शर्मा (सध्या रा. वसई, मूळ रा. बिहार) असल्याचे समजले. शर्माविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत मुलीचा मामा पुण्यात राहायला असून, आरोपी शर्माने मुलीला मामाकडे नेतो, असे सांगून तिचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे.