पुणे : पोलीस कर्मचाऱ्याने पीएमपी बसमध्ये शिरून चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला आहे.

बंडगार्डन रस्त्याने पीएमपी बस निघाली होती. बंडगार्डन रस्त्याने दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी निघाला होता. पीएमपी बस शेजारून भरधाव वेगाने गेल्याने पोलीस कर्मचारी चिडला. त्याने पीएमपी बससमोर दुचाकी आडवी लावली. पोलीस कर्मचाऱ्याने हेल्मेट परिधान केले होते. पोलीस कर्मचारी पीएमपी बसमध्ये शिरला. त्याने चालकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वाहकाने मध्यस्थी केली. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने वाहकाला मारहाण केली. त्यावेळी वाहकाने नेमकी काय चूक झाली आहे? अशी विचारणा पोलीस कर्मचाऱ्याकडे केल्याचे चित्रफितीत दिसून आले आहे. मारहाण करणारा पोलीस कर्मचारी तेथून निघून गेला.

या घटनेनंतर पीएमपी चालक आणि वाहकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात येणार आहे. अद्याप त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही.दरम्यान, या प्रकारानंतर पीएमपी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.