पुणे : मुंबईतील पोलीस दलाच्या ‘फोर्स वन’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलीस चौकीच्या आवारात घडली. याप्रकरणी निलेश आंद्रेस भालेराव (रा. कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिला पोलीस निरीक्षकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी निलेश भालेराव मुंबईतील फोर्स वन पथकात नियुक्तीस आहे. तक्रारदार महिला पोलीस निरीक्षक या राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्तीस होत्या. २०१८ मध्ये भालेराव प्रशिक्षणासाठी आला होता. त्यावेळी त्याने पोलीस निरीक्षक महिलेशी वाद घातला होता. शासकीय कामात अडथळा, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी भालेरावविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा – शत्रूच्या हल्ल्यात पुण्यातील जवान हवालदार दिलीप ओझरकर शहीद
पोलीस निरीक्षक महिलेने याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात भालेरावविरुद्ध फिर्याद दिली होती. भालेरावच्या कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक महिलेला विनंती केली होती. विनंती केल्यानंतर भालेरावविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात आली होती. पोलीस निरीक्षक महिलेने गुन्हा मागे घेतल्यानंतर आरोपी भालेरावने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलीस निरीक्षक महिला पतीसह सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलीस चाैकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी भालेराव तेथे आला. त्याने पोलीस निरीक्षक महिलेशी अभिरुची पोलीस चौकीच्या आवारात वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. भालेरावविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी विनयभंग, तसेच धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव तपास करत आहेत.