पुणे : नाशिक येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, शनिवारी मुंबई-बंगळुरु महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसचा टायर फुटून अपघात झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले. मुंबई-बंगळुरू महामार्गावर (पुणे-सातारा महामार्ग) सारोळे गावाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसचा टायर फुटला. अपघातात शमशाद अल्ली अजमत अल्ली खान, नहिरा नूर अय्यमद, सुधीर संजय साळुंके, मनोज चौथीलाल जाटप, मारिया हे प्रवासी जखमी झाले. त्यांना ससून रुग्णालय, शिरवळ तसेच नसरापूर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा चालकभरत भूषण पुजारी (वय ३९, रा. अंधेरी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसमधील प्रवासी फिरोज खोजा अत्तार (वय ३९, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) यांनी या संदर्भात राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

महामार्गावर अवजड वाहन (ट्रेलर) थांबले होते. त्या वेळी गोव्याहून मुंबईकडे खासगी प्रवासी बस निघाली होती. भोरजवळील सारोळा गावाजवळ भरधाव बसचालकाचे नियंत्रण सुटले. दुभाजकावर बस आदळली आणि रस्ता ओलांडून बस अवजड वाहनावर (ट्रेलर) आदळली. अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A private bus tire burst accident no casualties bus passenger pune print news ysh