चिन्मय पाटणकर
पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या अजब कारभाराचा नवा नमुना समोर आला आहे. शालेय पाठय़पुस्तकात वह्यांची कोरी पाने जोडण्याचा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केला. विशेष म्हणजे, मंत्र्यांनी घोषणा केल्यावर आता या बदलाच्या अनुषंगाने वास्तववादी माहितीच्या संकलनासाठीचे ऑनलाइन सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) करण्यात येत आहे.
गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण, वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नसल्याने पाठय़पुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. पाठय़पुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याची निकड जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे बालभारतीने सर्वेक्षणाच्या ऑनलाइन प्रश्नावलीत नमूद केले आहे. ही ऑनलाइन प्रश्नावली भरण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले आहे. पाठय़पुस्तकातील वह्यांच्या पानांनी वह्यांचा वापर थांबेल का, पाठय़पुस्तकातील वह्यांच्या पानांवरील नोंदी विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील का, पाठय़पुस्तकातील वह्यांच्या पानांचा वापर विद्यार्थी कशासाठी करतील, असे प्रश्न प्रश्नावलीत विचारण्यात आले आहेत.
एकीकडे शालेय शिक्षण विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या उपक्रमाची माहिती अनेकदा दिली आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासूनच नव्या प्रकारची पुस्तके वितरित केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मग निर्णय प्रक्रिया आणि नियोजन झाल्यावर वास्तववादी माहिती संकलित करण्याचे सर्वेक्षण करून उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बालभारतीकडून सर्वेक्षणाद्वारे माहिती मागवण्यात आली आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या प्रश्नावलीत माहिती भरताना ‘ऑटो टिक’ होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन झालेले आहे. केवळ सर्वेक्षण केल्याचा फार्स केला जात आहे.
– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ