पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील सर्व आठ जागा लढविण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मतदारसंघ निहाय सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवालही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, स्वबळावर किती जागा लढवायच्या, याबाबतचा निर्णय ठाकरे हे घेणार असून त्यासंदर्भात मुंबईत गुरुवारी (२५ जुलै) आढावा बैठक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणूक महायुतीऐवजी स्वबळावर लढविण्याची चाचपणी मनसेकडून सुरू झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांत मनसेकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यादृष्टीने पुण्यातही मनसेकडून निवडणूक तयारी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून तो रात्रभर मृतदेहाशेजारी झोपला

शहरात विधानसभेच्या आठ जागा आहेत. महायुतीमध्ये निवडणूक लढविल्यास मर्यादित जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवावी, अशी काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यादृष्टीने कसबा, पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला या आठही विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल राज ठाकरे यांना गेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व २१ जागांचा आढावा राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. त्यामध्ये पुण्यातील सर्व आठही जागांचा समावेश असून याबाबतचा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत, अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे: लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा जवान ताब्यात; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

कोणत्या जागा आणि किती जागा लढवायच्या, यासंदर्भात मुंबईत गुरुवारी (२५ जुलै) बैठक होणार आहे. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपशहराध्यक्ष, उपजिल्हाध्यक्षांसह अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A review meeting will be held in mumbai regarding mns seat allocation in pune for assembly elections 2024 pune print news apk 13 amy
Show comments