पुणे शहरात बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकीविरोधात पुण्यातील रिक्षाचालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल (सोमवार) पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालकांनी भाग घेत शहरातील रिक्षा वाहतूक बंद ठेवली होती. मात्र,काही रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. आंदोलनात सहभागी न झालेल्या रिक्षावर कात्रज भागात दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढचं नाही तर रिक्षाची तोडफोड करत चालकाला चिथावणी दिल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी ‘वाट बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे: हडपसरमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा बोपदेव घाटात खून

या प्रकरणी वाट बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर, संजीव कवडे, तुषार पवार, बाबा सय्यद यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रिक्षा चालक उदय चंद्रकांत शिर्के (वय ४६, रा. कसबा पेठ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी टॅक्सीच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा संघटनांकडून सोमवारी (१२ डिसेंबर) आंदोलन करण्यात आले. आंदाेलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षा फोडा, जाळा, असे चिथावणीकर वक्तव्य करण्यात आले होते.

हेही वाचा- आज पुणे बंदची हाक,शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडक बंदोबस्त

आंदोलनात सहभागी न झालेले रिक्षा चालक शिर्के कात्रज भागातील आंबेगाव परिसरात प्रवासी वाहतूक करत होते. त्या वेळी अज्ञातांनी रिक्षा अडवून रिक्षाची तोडफोड केली. शिर्के यांच्या खिशातील ५०० रुपये हिसकावून नेले. तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rickshaw was vandalized for not participating in the protest in pune print news rbk 25 dpj