पुणे : सांगलीत शाळकरी मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच घडली. पुण्यातील रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एकावर चाकूने वार केले. गज, पट्ट्याने त्याला बेदम मारहाण केली. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, खडक पोलिसांनी चार शाळकरी मुलांना ताब्यात घेतले.
याबाबत अल्पवयीन मुलाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत दहावीत आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली चार अल्पवयीन मुले याच परिसरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत दहावीत शिक्षण घेत आहेत. तक्रारदार अल्पवयीन मुलाची एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका मुलाशी दोन दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती शाळेतील मित्रांना दिली.
हेही वाचा…महापालिकेने ‘एसआरए’चा अहवाल दडवला? अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी खटाटोप
मंगळवारी (३० जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास शाळकरी मुलगा रामोशी गेट परिसरातून निघाला होता. त्यावेळी चौघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ केली. तुझे बहुत मस्ती आयी हैं. दादागिरी करता है क्या ? अशी विचारणा करुन मुलावर चाकूने हल्ला चढविला. शाळकरी मुलाच्या छातीवर चाकूने वार केले. गज, साखळी, चामडी पट्ट्याने त्याला भररस्त्यात मारहाण केली. नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट पोलीस चौकीतील उपनिरीक्षक अश्विनी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
जखमी झालेल्या शाळकरी मुलावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल केलेली मुले अल्पवयीन आहेत. त्यांच्या पालकांना याबाबतची माहिती दिली. मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही, असे उपनिरीक्षक पवार यांनी सांगितले.
हेही वाचा…पुणे महापालिकेपुढे वेगळीच समस्या : केेंद्र सरकारकडून मिळालेले ११४ कोटी रुपये खर्च करायचे कसे?
शाळकरी मुलांना ‘भाईगिरी’चे आकर्षण
अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढत आहेत. गुन्हेगारी घटनात अल्पवयीन मुले सामील झाल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांना गुन्हेगारीकडे वळालेल्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारीकडे वळालेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. पोलीस ठाण्यांमध्ये समुपदेशन वर्ग आयोजित करावेत, असे आदेश दिले आहेत.