पुणे : सोसायटीसमोर गोंधळ घालताना हटकल्याने दोघांनी सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. मध्यरात्री झोपेत असताना तरुणांनी सुरक्षारक्षकावर हल्ला चढविला. पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या घटनेत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे.नथू दिनकर सुर्वे (वय ५८, रा. पापळवस्ती, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीक सुभाष बिबवे (वय २५, रा. गणात्रा काॅम्प्लेक्स, बिबवेवाडी-मार्केट यार्ड रस्ता), क्षितीज विनायक जैनक (वय २१, रा. नवी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. सुर्वे यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, सुर्वे रम्यनगरी सोसयाटीत सुरक्षारक्षक आहेत. ते रात्री सोसायटीच्या परिसरात असलेल्या दुकानाबाहेर झोपतात. काही दिवसांपुर्वी प्रतीक आणि क्षितीज रम्यनगरी सोसायटीत राहत असलेल्या मित्रासोबत गप्पा मारत थांबले होते. दोघे जण गोंधळ घालत होते. त्यावेळी सुर्वे यांनी दोघांना हटकले होते. सोसायटीत गोंधळ घालू नका, असे सुर्वे यांनी त्यांना सांगितले होते. सुर्वे यांना हटकल्याने दोघे जण त्यांच्यावर चिडले होते. मंगळवारी रात्री सुर्वे सोसायटीच्या आवारातील सराफी पेढीसमोर झाेपले होते. त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या सुर्वे यांच्या डोक्यावर आरोपींनी काेयत्याने वार केले. त्यांच्या हातावर वार करून आरोपी पसार झाले. सुर्वे यांचा हात फ्रॅक्चर झाला असून, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. प्रतीक एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कामाला आहे. त्याचा साथीदार क्षितीज महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd