पुणे : जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विधी महाविद्यालय रस्त्यावरील वरद प्राॅपर्टीज सोल्यूशन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महेश विजय कुंटे (वय ५१), अपर्णा महेश कुंटे (वय ४८, दोघे रा. कृष्णा रेसीडन्सी, विधी महाविद्यालय रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ नागरिक सिंहगड रस्त्यावरील सनसिटी रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. कुंटे दाम्पत्य वरद प्राॅपर्टीज सोल्यूशन कंपनीचे संचालक आहेत. कुंटे दाम्पत्याशी त्यांची ओळख झाली होती. कुंटे दाम्पत्याने त्यांना त्यांच्या कंपनीत २०१९ मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी वरद प्राॅपर्टीज सोल्यूशन कंपनीत वेळोवेळी एका कोटी ७६ लाख रुपये गुंतवणूक केली. गुंतवणुकीवर १९ लाख ५२ हजार रुपये परतावा देण्याचे कुंटे दाम्पत्याने वचनपत्राद्वारे कबूल केले होते. त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम, तसेच परतावा न देता एक कोटी ९५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगर तपास करत आहेत.