एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने बँक खात्यातून पावणे सहा लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना उघडकीस आली. चोरट्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाचे डेबिट कार्ड चोरुन बँक खात्यातून वेळोवेळी रोकड काढल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा >>>पुणे: ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा गजाआड

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक शनिवार पेठेत राहायला आहेत. ११ ऑक्टोबर रोजी ते बाजीराव रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम केंद्रात रोकड काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी चोरटा एटीएम केंद्राच्या परिसरात थांबला होता. ज्येष्ठ नागरिक एटीएममधून पैसे काढत होते. त्या वेळी चोरटा एटीएम केंद्रात आला आणि त्याने मदत करण्याचा बहाणा केला. चोरट्याने हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाचे डेबिट कार्ड चोरले. त्याऐवजी त्यांना दुसरे डेबिट कार्ड दिले.

हेही वाचा >>>पुणे : सुजित पटवर्धन हे तर पर्यावरण चळवळीचा कणा ; विविध मान्यवरांकडून आठवणींना उजाळा

चोरट्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाकडून एटीएम व्यवहाराचा सांकेतिक शब्द घेतला होता. ज्येष्ठ नागरिकाचे चोरलेले डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन चोरट्याने गेल्या दहा ते बारा दिवसात वेळोवेळी बँक खात्यातून पाच लाख ७९ हजार रुपये काढले. बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी सुतार तपास करत आहेत.

हेही वाचा >>>विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; एकास अटक

पोलिसांचे आवाहन
एटीएम केंद्राच्या परिसरात चोरट्यांचा वावर असतो. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी बँक खात्यातून रोकड काढल्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत. मदतीचा बहाणा करणाऱ्या चोरट्यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Story img Loader