डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी १७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक वारजे भागात राहायला आहेत. ते बँकेत अधिकारी होते. निवृत्तीनंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात श्रेया नावाच्या एका तरुणीने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. तेव्हा तिने तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखविले होते. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर तिने तरुणींची छायाचित्रे पाठविली होती.
हेही वाचा >>>पुणे:ठेकेदारांची पाठराखण; अधिकाऱ्यांवर कारवाई?
सुरुवातीला त्यांनी ऑनलाइन पद्धतीने आरोपी श्रेयाच्या बँक खात्यात तीन हजार रुपये पाठविले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी करण्यात आली. श्रेयाने दिलेल्या बँक खात्यात त्यांनी वेळोेवेळी पैसे पाठविले. दरम्यान, तरुणींशी मैत्री न झाल्याने त्यांनी विचारणा केली. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. श्रेयाच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी पुन्हा संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. तक्रारादाराला आमिष दाखवून वेळोवेळी १७ लाख १० हजार रुपये उकळण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे तपास करत आहेत.