पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या वाड्यांना झोपडपट्टी असल्याचा अभिप्राय देऊन तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर त्याची दखल महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतली आहे. यासंदर्भात कुमार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला पत्र दिले असून अशा सर्व प्रकरणांना स्थगिती द्यावी, अशी सूचना केली आहे. तसेच महापालिकेच्या स्तरावर या प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक जुने वाडे असून एकात्मिक बांधकाम नियमावलीतील तरतुदींमुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. या दरम्यान, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने शहरातील एखाद्या भागात झोपडपट्टीसदृश भाग असल्यास आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने त्याबाबत अभिप्राय दिल्यास अशा ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविता येईल, असे पत्राद्वारे शासनाला कळविले होते. त्यानंतर महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि उपअभियंत्यांनी तसा अभिप्राय दिला होता. मध्यवर्ती भागातील ७० वाड्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत रुपांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी यासंदर्भात आयुक्त कुमार यांच्याकडे तक्रार नोंदविली होती.

हेही वाचा – पुणे : हडपसरमध्ये मोटारीचा धक्का लागल्याने टोळक्याकडून मोटारचालकाचा खून

हेही वाचा – पुणे : पदपथांच्या दुरवस्थेची उच्च न्यायालयाने घेतली दखल; महापालिका, महामेट्रोला दिला ‘हा’ आदेश

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जुन्या वाड्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत देण्यात आलेल्या परवनग्या स्थगिती करून तेथील बांधकाम थांबवावे आणि त्याचा अहवाला महापालिकेला सादर करावा, अशी सूचना केली आहे. तसेच महापालिकेच्या स्तरावर त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील आणि दक्षता विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गिरोला यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर उपअभियंत्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A shocking case has come forward that the slum rehabilitation scheme is being implemented in the old palaces showing as slums pune print news apk 13 ssb
Show comments