पुणे: देवघरातून एक किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरणाऱ्या महिलेस कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. उज्ज्वला नागनाथ बचुटे (वय ५०, रा. फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत हुकुमचंद कोटेचा (रा. कोरेगांव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोटेचा यांच्याकडे बचुटे घरकाम करत होती. तिने कोटेचा यांच्या देवघरातील एक चांदीची मूर्ती चोरली होती. चोरी करुन ती पसार झाली होती. कोटेचा यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास करण्यात येत होता. बचुटे कोरेगाव पार्क भागातील साऊथ मेन रोडवर थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले.
बचुटेकडून चांदीची मूर्ती, चांदीचा हार ;तसेच देवघरातील पूजा साहित्य असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, दत्तात्रय लिंगाडे, नामदेव खिलारे, रमजान शेख, विजय सावंत, विवेक जाधव, ज्योती राऊत, वैशाली माकर आदींनी ही कारवाई केली.