पुणे : भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता साहित्यसम्राट न. चिं. केळकर रस्त्यावर घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीन ते चार जण जखमी झाले. या घटनेनंतर केळकर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. प्रक्षुब्ध जमावाने मोटारीवर हल्ला करून चालकाला मारहाण केली. विश्रामबाग पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले.
आरोपी वाहन चालक उमेश हनुमंत वाघमारे, वय ४८ असे नाव आहे.तर नटराज बाबुराव सूर्यवंशी वय ४४ असे गाडीमालकाचे नाव आहे.या दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर विश्वनाथ राजउपाध्ये, वय ५६ यांचा जागीच मृत्यू झाला. न. चिं. केळकर रस्त्यावरून भरधाव मोटार टिळक चौकाच्या दिशेने जात होती. बाबा भिडे पुलाजवळील चौकाच्या पुढे गेल्यानंतर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. भरधाव मोटारीने हिंदू महिला आश्रमाच्या जुन्या इमारतीच्या कोपऱ्यावर पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवले. गाडगीळ पुलाजवळ झालेल्या या अपघातात ५५ वर्षीय एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले.
हेही वाचा >>>कोथरूडमधील आगीमध्ये आलिशान सदनिकेतील पाच खोल्या भक्ष्यस्थानी
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. मोटारीने धडक दिलेल्या वाहनांमध्ये दुचाकी आणि काही रिक्षा होत्या. त्यामुळे यातील काही प्रवासी जखमी झाले. केळकर रस्ता, लक्ष्मी रास्ता , टिळक चौक या भागात रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.