लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गणेशोत्सवात सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटना विचारात घेऊन पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ मंगळवारी (१९ सप्टेंबर) होणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक दर्शनासाठी येतात. परदेशी नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात. उत्सवाच्या कालावधीत मध्यभगाात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियाेजन केले आहे. भाविकांकडील मोबाइल चोरी, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत.

हेही वाचा… प्रवांशासाठी खूशखबर! पुणे रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू

पोलीस आयुक्तालयातील पाच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले एक हजार ३०० पोलीस कर्मचारी, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या बंदोबस्तात राहणार आहे. बंदोबस्तास पोलीस मित्र सहाय्य करणार आहेत.

हेही वाचा… पुणे रेल्वे स्थानकाला लवकरच पर्याय! हडपसर रेल्वे टर्मिनल उभारणीला गती

उत्सवाच्या कालावधीत मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणची बाॅम्ब शाेधक नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलीस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चार वेळा तपासणी करणार आहेत.

उत्सवी गर्दीवर १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

उत्सवी गर्दीवर शहरातील १८०० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहे. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पुणे पाेलिसांनी कोथरुड परिसरातून अटक केली. संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून उत्सवाच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Story img Loader