पिंपरी: व्यावसायिक मालमत्तांना आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील व्यावसायिक इमारतींचे अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार आहे.
शहरात व्यावसायिक इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसेंदिवस नवीन इमारतींची संख्याही वाढत आहे. इमारतीमध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, प्रमाणपत्र महापालिका अग्निशामक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटाधारकाची आहे.
हेही वाचा… पुणे: विजयादशमीला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान
शहरात आगीच्या घटना घडू नयेत तसेच घटना घडल्यास जीवित वा वित्तहानी होऊ नये यासाठी व्यावसायिक इमारतींमध्ये आवश्यक असणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक भोगवटादार याकडे दुर्लक्ष करत आहेत. आग लागल्यानंतर या बाबी उघडकीस येतात. शहरातील व्यावसायिक इमारतींतील अग्निशामक यंत्रणांवर लक्ष ठेवणे अग्निशामक दलाला शक्य नाही.
अग्निशामक विभागास प्राप्त होणाऱ्या वर्दीची संख्या विचारात घेता व्यावासायिक मालमत्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाकडील बचत गटांच्या महिलांकडून व्यावसायिक इमारतींचे अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. व्यावसायिक इमारतीतील अग्निशामक यंत्रणा कोणत्या स्थितीत आहे याची छायाचित्रे, दिलेले परवाने, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अग्निशामक विभागाकडे जमा करणे बंधनकारक राहील.
व्यावसायिक मालमत्ताधारक, इमारतीचे मालक, भोगवटादारांनी अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सर्वेक्षणाकरिता सहकार्य करावे. – प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका