मधुमेहाच्या टाईप- १ आणि टाईप- २ या दोन्ही प्रकारांत उपयोगी पडणारे औषध शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू असून भविष्यात मधुमेहात घ्याव्या लागणाऱ्या इन्सुलिनच्या इंजेकशनना तोंडावाटे घ्यायचे हे औषध पर्याय ठरू शकेल. पुण्यातील आघारकर अनुसंधान संस्थेच्या ‘नॅनो जैवविज्ञान केंद्रा’ त हे संशोधन सुरू आहे.
या संशोधनात ‘झिंक ऑक्साईड’ या मूलद्रव्याचे नॅनोपार्टिकल्स (अतिसूक्ष्म कण) वापरून औषध निर्मिती करण्यात येत आहे. सध्या हे संशोधन ‘प्री क्लिनिकल ट्रायल’ पातळीला असून त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याचे प्राण्यांवरील प्रयोग सुरू आहेत. हे औषध प्रत्यक्ष बाजारात उपलब्ध व्हायला अजून वेळ असला तरी रोज इन्सुलिनचे इंजेकशन घेणाऱ्या लाखो मधुमेही रुग्णांना या इंजेकशनपासून मुक्ती मिळण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. ‘नॅनोमेडिसिन’ या शोधनियतकालिकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.  
रिसर्च असोसिएट रिंकू उमराणी म्हणाल्या, ‘‘इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. तर झिंक शरीरातील इन्सुलिनचा स्त्राव वाढविण्यास कारणीभूत ठरते. शिवाय ‘झिंक’ला ‘इन्सुलिन मायमेटिक’ असे म्हटले जाते. म्हणजेच शरीरात इन्सुलिन जे कार्य करते तेच झिंकही करू शकते. त्यामुळे झिंक ऑक्साईड नॅनोपार्टिकल्सचा वापर करून टाईप- १ आणि टाईप- २ या दोन्ही प्रकारांत उपयोगी पडणारे औषध शोधून काढणे हा या संशोधनाचा उद्देश होता. मधुमेहावर नॅनोपार्टिकल्स वापरून औषध तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या औषधाचे प्राण्यांवरील प्रयोग सुरू आहेत, मात्र मानवी शरीरात गेल्यावर ते नेमके कसे कार्य करेल याचा अभ्यास होणे अद्याप बाकी आहे. संशोधनाची सुरक्षितता व परिणामकारकता पूर्णपणे सिद्ध झाल्यानंतरच ते औषध म्हणून उपयोगात आणले जाऊ शकेल.’’
आघारकर संस्थेच्या सूक्ष्मजीवविज्ञान व नॅनो जैव विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर पाकणीकर म्हणाले, ‘‘तोंडावाटे घ्यायचे हे औषध दोन्ही प्रकारच्या मधुमेहात इन्सुलिनच्या इंजेकशनना पर्याय ठरू शकणार असल्याने भविष्यात मधुमेहावरील औषधोपचारांचा खर्च कमी होऊ शकेल. हे औषध प्रत्यक्ष बाजारात यायची प्रक्रिया मात्र वेळखाऊ आहे. औषधाच्या सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पूर्ण होण्यास अजून सुमारे आठ वर्षे लागण्याची शक्यता आहे. झिंक ऑक्साईडमुळे शरीरातील इन्सुलिनचे स्त्रवण वाढते हे जरी लक्षात आलेले असले तरी रुग्णांनी स्वत:च्याच मनाने झिंक ऑक्साईडचे सेवन करू नये.’’