पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) सुरू असणाऱ्या माण-मारूंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले. पोलिसांनी हे बॉम्बशेल ताब्यात घेतले आहे. याबाबत संरक्षण विभागाच्या सदन कमांडला कळविण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी हे बॉम्बशेल त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, माण-मारुंजी रस्त्यावर ब्ल्यू रिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पीएमआरडीएमार्फत पुलाचे काम सुरु आहे. बुधवारी (३ एप्रिल) दुपारी जेसीबीने खोदकाम करून माती काढत असताना कामगारांना बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वस्तूची पाहणी केली. त्यामध्ये रणगाड्याच्या बॉम्बचा पुढील भाग (बॉम्बशेल) असल्याचे आढळून आले.
हेही वाचा – बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?
हेही वाचा – केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
बॉम्बशोधक-नाशक पथकाने पाहणी करून ते ताब्यात घेतले आहे. मात्र, हे बॉम्बशेल खूप जुने असल्याने ते जिवंत आहे की निकामी हे अद्याप समजू शकलेले नाही. संरक्षण विभागाला याबाबत कळविण्यात आले असून हे बॉम्बशेल सदन कमांडच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संरक्षण विभागाकडून त्याची पाहणी केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, असे थोरात यांनी सांगितले. दरम्यान, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बाणेर येथे ५ डिसेंबर २०२३ रोजी जुने हातबॉम्ब सापडले होते. पोलीस आणि बॉम्बशोधक-नाशक पथकाने (बीडीडीएस) बॉम्ब सुरक्षित स्थळी हलवले. ते ब्रिटीशकालीन बॉम्ब होते.