पुणे : घराच्या छतावर लटकणाऱ्या वीजवाहिनीच्या धक्क्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुभ्रा ओहाळ (वय १०) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी महेमुद्दीन मगदूम (रा. बोपोडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभ्राचे वडील गणेश अरविंद ओहाळ (वय ३५, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – राज्यातील ७३ लाख विद्यार्थ्यांची आधार कार्ड माहिती जुळेना

गणेश ओहाळ बोपोडीतील पवळे चाळीत राहायला आहेत. मगदूम यांचे ते भाडेकरी आहेत. शुभ्रा घराच्या छतावर गेली. त्या वेळी उच्चदाबाच्या वाहिनीच्या संपर्कात शुभ्रा आली. तिला वीजवाहिनीचा धक्का बसल्याने ती छतावर कोसळली. गंभीर जखमी झालेल्या शुभ्राला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – मुद्रांक शुल्क अधिभाराचे पुणे महापालिकेला १०५ कोटी, पिंपरी-चिंचवडला ३२ कोटींचा निधी

मगदूम याच्या खोलीवर महावितरणची उच्चदाबाची वाहिनी आहे. मगदूम याने दुमजली घर बांधले होते. उच्च दाबाची वाहिनी छतावर लटकत होती. उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्यानंतर गंभीर दुर्घटना होऊ शकते, याची जाणीव घरमालक मगदूम याला होती. मगदूम याने बेकायदा बांधकाम केले. घरमालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे शुभ्राचे वडील गणेश ओहाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A ten year old girl died after coming in contact of power line pune print news rbk 25 ssb