पुणे : जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करुन जुने फर्निचर स्वस्तात विक्रीच्या आमिषाने ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चोरट्याला सायबर पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. शाहरूख काटुला खान (वय २३, रा. खानजादवाडी, अलवर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याप्रकरणी खान याच्यासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार पत्रकार आहे. समाजमाध्यमातील संदेश सुविधेद्वारे तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी खानने तक्रारदाराकडे केली होती. माझा मित्र संतोषकुमार केंद्रीय सुरक्षा दलात नियुक्तीस आहे. त्याला जुने फर्निचर विकायचे आहे, अशी बतावणी खानने तक्रारदाराकडे केली होती. खानने फर्निचर स्वस्तात विक्रीचे आमिष दाखवून ऑनलाइन पद्धतीने ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर फर्निचर पाठविले नाही.
हेही वाचा – चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘मी पुण्याचा सहपालकमंत्री!’
हेही वाचा – पुण्यातील मावळ, शिरूर लोकसभा मनसे लढवणार; उमेदवार राज ठाकरे ठरवणार!
फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, शाहरुख शेख आदींनी तपास करुन खानला राजस्थानातील अलवर शहरातून अटक केली.