पुणे : पुणे कटक मंडळातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या सराइतास गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डाॅक्टर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, तसेच त्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागितल्याचे २० पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत.
अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे कटक मंडळातील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाच्या मोबाईल क्रमांकावर कांबळेने काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता. नगरसेवकाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करतो. मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त असल्याची बतावणी कांबळेने केली होती. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकाने फिर्याद दिली होती.
हेही वाचा – पुणे : दुचाकी चोरट्याला आठ महिने सक्तमजुरीची शिक्षा
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून करण्यात येत होता. आरोपी कांबळे ससून रुग्णालयाच्या परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी मोहसीन शेख आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, संजय जाधव, मोहसीन शेख, निखील जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.