घरफोडीचे १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सांगलीतील चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली. चोरट्याने बिबवेवाडीत घरफोडीचे दोन गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच्याकडून मोटार, सोन्याचे दागिने असा १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : मार्केट यार्ड परिसरात तरुणाला लुटले ; मारहाण करुन मोबाइल हिसकावला
लोकेश रावसाहेब सुतार (वय २८, रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बिबवेवाडी परिसरात दहा दिवसांपूर्वी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. चोरटा घरफोडी केल्यानंतर मोटारीतून पसार झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी पुणे-सातारा रस्ता, बिबवेवाडी भागातील ९० ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते.तपासात सांगलीतील चोरटा लोकेश सुतारने घरफोडीचे गुन्हा केल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सांगलीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा तोळे सोन्याचे दागिने, मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, अभिषेक धुमाळ, तानाजी सागर, सतीश मोरे, शिवाजी येवले, अतुल महांगडे, प्रणव गायकवाड, पंचशिला गायकवाड आदींनी ही कारवाई केली.