लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: फर्ग्युसन रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसवर गुरूवारी सायंकाळी जीर्ण झालेले झाड पडल्याची घटना घडली. बसच्या काचा आणि समोरील बाजूवर या झाडाच्या फक्त फांद्या आदळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत चालकाला किरकोळ मार लागला असून, प्रवाशांना काहीही झाले नाही.

पीएमपीची अप्पर ते निगडी ही बस फर्ग्युसन रस्त्यावरून सायंकाळी सहाच्या सुमारास जात होती. फर्ग्युसन महाविद्यालय समोरील थांब्यावर बस उभी राहिली. बसमध्ये काही प्रवासी चढले आणि बस हळूहळू सुरू झाली; पण तेवढ्यात मोठा आवाज झाला. पदपथावर असलेले जीर्ण गुलमोहराचे झाड मोडून बसवर कोसळले. झाडाचा बुंधा पदपथावर पडला, तर पुढील फांद्या बसच्या काचा आणि समोरच्या बाजूवर आदळल्या.

हेही वाचा… पिंपरी चिंचवड : पवना धरण ओव्हरफ्लो; ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

‘अचानक झालेला आवाज आणि तेवढ्यात झाड बसवर आदळल्यामुळे चालक आप्पाराव जाधव यांनी तत्काळ बस थांबवली. पण, या दरम्यान ते बाजूला पडले. यात त्यांच्या पायाला किरकोळ मार लागला. या वेळी बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. झाड बसवर आदळल्यानंतर आतमधील प्रवासी घाबरून मागील बाजूला पळाले.

हेही वाचा… तृतीयपंथीच्या दहीहंडीला पुणेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

पूर्ण झाड बसच्या मध्यावर पडले असते, तर मोठाच अपघात झाला असता. या घटनेनंतर नागरिकांना दुसऱ्या बसने पाठविण्यात आले. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती पीएमपीच्या अपघात विभागाला देण्यात आली आहे,’ अशी माहिती वाहक महादेव डोंगरे यांनी दिली. या घटनेनंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बससमोर पडलेल्या झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला. यामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक संथ झाली होती. बस खूप हळूहळू चालली होती.

अचानक मोठा आवाज झाला आणि झाड बसवर पडले. त्यामुळे बसच्या काचा फुटून माझ्या अंगावर आल्या. यात मी जागेवरून बाजूला पडलो. प्रवासीही घाबरून मागे पळाले. माझ्या पायाला थोडेसे लागले आहे. – आप्पाराव जाधव, चालक, पीएमपी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tree fell on a pmp bus at fergusson road pune print news vvk 10 dvr
Show comments