रस्ता चुकल्याने झालेल्या वादातून ट्रकचालकाच्या डोक्यात सहकाऱ्याने (क्लिनर) गज मारून खून केल्याची घटना नगर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोणीकंद पोलिसांनी नाशिक परिसरातून त्याला अटक केली.
शहजाद अब्दुलकयूम अहमद (वय २६, रा. पोखर मिटवा, जि. वस्ती, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. या प्रकरणी क्लिनर शमशूल अलीअहमद खान (वय २६, रा. चायकला, जि. संत कबीननगर, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. संजय रामफल कालीरामना (वय २६, रा. शुभम ग्रीन सिटी, बलसाड, गुजरात) यांनी याबाबत लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कालीरामना यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ट्रकवर आरोपी शमशूल क्लिनर म्हणून काम करत होता. ट्रकचालक शहजाद आणि क्लिनर शमशूल पुणे-नगर रस्ता परिसरातील तुळापूर ते लोणीकंद या रस्त्यावरून निघाले होते. त्या वेळी ट्रकचालक शहजाद वाट चुकला. या कारणावरून शहजाद आणि क्लिनर शमशूल यांच्यात वाद झाला. शमशूलने ट्रकमधील लोखंडी गज शहजादच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी अवस्थेतील शहजादचा ट्रकच्या केबीनमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर शमशूल पसार झाला.
हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक: काँग्रेस ‘एकला चलो’वर ठाम; निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धूसर
दरम्यान, ट्रक न पोहचल्याने ट्रकमालक कालीरामना यांनी दोघांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. दोघांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आली. चौकशीत ट्रक तुळापूर ते लोणीकंद रस्त्यावर थांबला असून ट्रकचालक शहजादचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरू केला. तेव्हा आरोपी शमशूल नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला नाशिकमधून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.