जेजुरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण सर्टिफिकेटला ‘मल्हार सर्टिफिकेशन’ नाव देण्याची घोषणा वादात सापडली आहे. जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये या निर्णयावरून मतभेद झाले आहेत. देवस्थानचे विश्वस्त डॉ .राजेंद्र बबनराव खेडेकर यांनी या घोषणेला विरोध केला असून याबाबतचे पत्र राणे यांना पाठवले आहे, तर विश्वस्त मंगेश घोणे यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. राणे यांनी राज्यातील हिंदू खाटीक समाजातील मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेशन दिले जाणार आहे. हलाल विरोधात मल्हार सर्टिफाइड झटका मटण विक्री करण्यात येणार असून या दुकानातूनच हिंदू समाजाने मल्हार मटन खरेदी करावे, अशी योजना असल्याचे म्हटले आहे. मात्र, नितेश राणे यांचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जेजुरीच्या खंडोबा देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांनी झटका मटण सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्यास तीव्र विरोध केला आहे.
डॉ. खेडेकर यांनी राणे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण मटन विक्रेत्यांसाठी घेतलेला निर्णय अत्यंत सार्थ आहे, जेणेकरून आपण कोणाकडून मटन खरेदी करतोय हे आपल्याला समजेल; तसेच गोमांस किंवा इतर प्राण्यांच्या मांस विक्रीला आळा बसेल. मात्र, आपण या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन असे दिलेले नाव अत्यंत चुकीचे आहे. हे नाव त्वरित बदलावे.
‘जेजुरीचा खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो. या देवालाच मल्हार, सदानंद ,मार्तंड अशा विविध नावाने ओळखले जाते. खंडोबा हा मूळ शाकाहारी देव असून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची परंपरा आहे. मटन नैवेद्य चालत नाही. चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत व भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो. ही देवता पूर्ण शाकाहारी आहे. विशेष म्हणजे खंडोबा देवता ही मुक्या प्राण्यांवर नितांत प्रेम करणारी देवता असून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे, बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो. त्यामुळे आपण झटका मास सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्याचा निर्णय रद्द करावा व दुसरे नाव ठेवावे, असेही पत्रात नमूद केले आहे.
खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्येच मतभेद
मल्हार सर्टिफिकेशन या मुद्द्यावरून खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्येच मतभेद झाले आहेत. विश्वस्त मंगेश घोणे यांनी नितेश राणे यांच्या या योजनेला जाहीर पाठिंबा दिला असून हिंदू खाटीक, धनगर समाजाच्या हितासाठी ही अतिशय चांगली योजना आहे. आपण कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाला देवाचे नाव देतो. मग हे नाव दिले म्हणून बिघडले कुठे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली आहे. श्री मार्तंड देवस्थान समितीचा याच्याशी संबंध नाही. याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वतः मंत्री नितेश राणे यांना भेटून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचा सत्कार करणार आहे.
जेजुरीच्या खंडोबाला मटणाचा नैवेद्य नाही
जेजुरीचा खंडोबा हे अठरापगड जातीचे दैवत असून खंडोबा गडावर पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवला जातो . अनेक समाजामध्ये जेजुरीला येऊन कुलधर्म करताना जागरण गोंधळाच्या वेळी बकरे कापण्याची प्रथा आहे. मात्र हा मासाहारी नैवेद्य खंडोबाची धाकटी बायको बाणाई देवी हिला नेऊन दाखविला जातो. बाणाई देवी धनगर समाजातील मानली जाते. या देवीचे मंदिर अर्ध्या वाटेवर आहे. येथून पुढे मटणाचा नैवेद्य खंडोबा मंदिरात गडावर कधीही नेला जात नाही. येथील ऐतिहासिक होळकरांच्या चिंच बागेमध्ये दररोज शेकडो यात्रेकरू उतरून मटणाची जेवणे करीत असतात मात्र हे नैवेद्य बानुबाईलाच दाखवला जातो. मल्हार मटन नावाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. – मंगेश घोणे, विश्वस्त, खंडोबा देवस्थान