फळांचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात देवगड हापूसची पहिली पेटी दाखल झाली. आठवड्यापूर्वी मुंबईतील बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी विक्रीस पाठविण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवगड हापूसचा हंगाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. हंगाम सुरू होण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. आंब्यांच्या हंगामाची खवय्यांना प्रतीक्षा असते. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर भागातील शेतकरी जयेश कांबळी यांनी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अनिरुद्ध भोसले यांच्या गाळ्यावर रविवारी (१९ डिसेंबर) देवगड हापूसची पेटी विक्रीस पाठविली आहे. कांबळी यांच्या बागेत आंब्याची ४०० झाडे आहेत. ऑक्टोबर महिन्यात काही निवडक झाडांना फळे आली. निवडक झाडांवरील फळांची पेटी बाजारात विक्रीस पाठविण्यात आली, असे आंबा उत्पादक शेतकरी जयेश कांबळी यांनी सांगितले.

हेही वाचा: ले. कर्नल पुरोहित ‘द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशन सोहळा; पुण्यात भीम आर्मी बहुजन एकता आणि मूलनिवासी मुस्लिम मंचाचे आंदोलन

रविवारी मार्केट यार्डात विक्रीस पाठविलेल्या देवगड हापूसच्या पेटीला ४२ हजारांचा उच्चांकी भाव मिळाला. भोसले यांच्या गाळ्यावर देवगड हापूसची पेटी दाखल झाल्यानंतर पेटीचे पूजन करण्यात आले. या वेळी फळबाजारातील अडते उपस्थित होते. मुंबई-पुण्यातील फळबाजारात हंगामपूर्व आंब्याची आवक झाली आहे. हंगामपूर्व आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात नसतात. हंगामपूर्व आंब्याची पेटी अडत्यांकडून खरेदी केली जाते. बाजारात आंबा दाखल होण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. आंब्याच्या पहिला बहरात आंब्यांची आवक नेहमीच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात.

हेही वाचा: गृहमंत्री अमित शहा, चंद्रकांत पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

साधारणपणे देवगड हापूसचा हंगाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. देवगड हापूसचा हंगाम सुरू होण्यास अद्याप दीड ते दोन महिने कालावधी आहे. फेब्रुवारी महिन्यात देवगड हापूसची आवक टप्याटप्याने वाढून नियमित सुरू होईल. त्यानंतर रत्नागिरी हापूसची आवक सुरू होईल. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंब्यांचे दर चढे असतात. – अनिरुद्ध भोसले, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A two month wait for alphonso season first box of devgad alphonso in the market in pune print news rbk 25 tmb 01