पुणे : केंद्र आणि राज्य शासनाने देशभरातील १२ किल्ले ‘मराठा’ लष्करी भूप्रदेश’ अंतर्गत जागतिक वारसास्थळांच्या नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. या अनुषंगाने युनेस्कोची समिती २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देण्यासाठी येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नामांकनाच्या प्रचार, प्रसार आणि जनजागृतीसाठी शहरासह जिल्ह्यात गड, किल्ल्यांची प्रतिकृती बनविणे, आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण करणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपासमोर गड, किल्ल्यांची माहिती देणारे डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा – किनारपट्टीवरील अतिवृष्टी कृत्रिम पावसाद्वारे टाळणे शक्य, सविस्तर वाचा ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांचा अभ्यास

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारने मराठा राजवटीत शत्रुशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना स्थान मिळण्यासाठी नामांकन दिले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खांदेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांचा समावेश आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे.

‘युनेस्कोची समिती २७ ते ३० सप्टेंबर या काळात पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देणार आहे. त्यापूर्वी या नामांकनाच्या प्रचार, प्रसार, जनजागृतीसाठी गणेशोत्सव काळात तालुका, जिल्हास्तरीय शालेय गड-किल्ले प्रतिकृती बनविणे स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाला एक लाख, द्वितीय ५० हजार, तर तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. गाव, शाळानिहाय प्रत्येकी एक गड-किल्ले प्रतिकृती सादर करण्यास मर्यादा आहे. उत्कृष्ट पद्धतीने सहभागी होणाऱ्या गावांपैकी पाच गावांना जनसुविधा, नागरी सुविधा या योजनांतर्गत ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तालुकास्तरावर निवड झालेले तीन विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेला पात्र होतील. यामध्ये प्रथम येणाऱ्यांना पाच लाख, द्वितीय अडीच लाख, तर तृतीय क्रमांकाला सव्वा लाखांचे पारितोषिक असेल’, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

हेही वाचा – गणेशोत्सवात पुण्यात दारूविक्रीवर निर्बंध, जाणून घ्या कधी चालू, कधी बंद

गणेशोत्सवात प्रचार, प्रसार

नामांकनाच्या प्रचार, प्रसारासाठी शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये, ऐतिहासिक संशोधन संस्था, वास्तुविशारद संस्था, गिरीप्रेमी यांच्या सहभागातून वास्तूरचना (आर्किटेक्चरल) दस्तऐवजीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सव काळात पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपासमोर गड-किल्ल्यांशी माहिती देणारे डिजिटल फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A unesco committee will come to pune to visit the forts of shivaji maharaj pune print news psg 17 ssb