सकाळी साडेनऊ ते दीड आणि सायंकाळी साडेचार ते साडेआठ ही दुकानाची वेळ असली तरी ग्राहक आधीच येऊन दुकान उघडण्याची वाट पाहात थांबलेले असतात. ही ए. व्ही. काळे सुगंधी यांच्या यशाचीच पावती आहे.
अनंत वामन काळे हे नाव काही चोखंदळ आणि चिकित्सक पुणेकरांनाच माहीत असेल. पण, ए. व्ही. काळे सुगंधी हे नाव माहीत नाही तो पक्का पुणेकर नाही असेच म्हणावे लागेल. पूजा साहित्य, अगरबत्ती आणि अष्टगंध यांचे व्यापारी असलेली ए. व्ही. काळे सुगंधी ही पेढी मध्यवर्ती पुण्याचे भूषण संबोधता येईल अशीच आहे. जिलब्या मारुती मंदिरापासून शनिपार रस्त्याकडे जाताना प्रत्येकालाच मोहीत करणाऱ्या सुगंधामुळेच ए. व्ही. काळे सुगंधी दुकानाजवळ आल्याची खूणगाठ पटते. १९५८ मध्ये विजया दशमी म्हणजेच दसऱ्याला स्थापना झालेल्या या दुकानाने ५८ वर्षे पूर्ण केली आहेत. जुने दुकान काळानुरूप नवीन झाले असले तरी ग्राहक सेवेची हमी तशीच कायम आहे. सकाळी साडेनऊ ते दीड आणि सायंकाळी साडेचार ते साडेआठ ही दुकानाची वेळ असली तरी अनेकदा ग्राहक आधीच येऊन दुकान उघडण्याची वाट पाहात थांबलेले असतात. ही ए. व्ही. काळे सुगंधी यांच्या यशाचीच पावती आहे.
ए. व्ही. काळे यांचे चिरंजीव जयंत काळे यांच्याकडे दुकानाची धुरा आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे त्यांना वडिलांबरोबर या व्यवसायामध्ये काम करावे लागले. मी या व्यवसायामध्ये काम करायला लागलो त्यालाही आता ३६ वर्षे म्हणजेच तीन तपे उलटून गेली. अर्थात हे दुकान पुणेकरांमध्ये एवढे लोकप्रिय झाले याचे सारे श्रेय माझ्या वडिलांचेच आहे. आम्ही केवळ त्यांनी केलेल्या कष्टाची फळं चाखतो आहोत. नेमक्या भाषेत सांगायचे तर हे दुकान म्हणजे चालू गाडी आहे. गाडी आणि पेट्रोल ए. व्ही. काळे यांचेच आहे. फक्त ‘ड्रायव्िंहग सीट’वरील माणूस बदलला आहे, अशा शब्दात जयंत काळे यांनी वडिलांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
ए. व्ही. काळे हे मूळचे कोकणातील राजापूरजवळील गोवळ गावचे. गावामध्ये त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. मात्र, वाणसामान घेऊन लोकांनी पैसे दिलेच नाही. तर, एकदा मोठा पूर आला आणि त्यामध्ये दुकान वाहून गेले. नऊ-दहा वर्षांचे असेपर्यंत अनंत काळे गोवळ येथे होते. गावात मराठी चौथीपर्यंतच शाळा असल्याने त्यांना गाव सोडणे भाग पडले. घरामध्ये सदस्यसंख्या मोठी असल्याने अनंत काळे यांनी गरिबी जवळून पाहिली. पुढील शिक्षणासाठी अनंत काळे सांगली येथे आले. सांगलीच्या राजवाडा चौकामध्ये मराठी शाळा भरत असे. माधुकरी मागून भोजन करायचे. सहावीची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर एक महिन्याच्या सुट्टीसाठी ते घरी परतले. पुढे वडिलांनी खाणावळ काढायची ठरवली. दोन वस्तू तारण ठेवून ३८ रुपये भांडवलावर राजापूर येथे १९३८ मध्ये काळे सुग्रास भोजनालय सुरू केले. महिनाभर दोन वेळा जेवणाचा दर आठ रुपये होता. तर, एक वेळ जेवणाचा दर अडीच आणे असा होता. ओढाताण बरीच होत होती. रोज भाजीला आणावे लागणारे चार-सहा आणेदखील कोठून तरी उसने आणावे लागत. असेच दोन-तीन वर्षे धंदा करून कंटाळल्याने खाणावळ बंद करावी लागली. पुढे त्यांनी मालवण येथे खाणावळ सुरू केली. पण, तेथील बहुतांश लोक मांसाहारी असल्याने खाणावळ चालेना. मालवणला भाऊ भट हे त्यांच्याकडे येत असत. त्यांचे भिडे नावाचे नातलग मुंबईला होते. त्यांना वरकामासाठी एक मुलगा हवा होता हे समजल्यावर वयाच्या १५ व्या वर्षी काळे यांनी बोटीचा प्रवास करून मुंबई गाठली. दोन महिने भरपूर काम करूनही पगार मिळाला नाही म्हणून भिडे यांचे घर सोडून काळे पुण्याला आले. शनिपार येथे गोरे आणि कंपनी या कापड दुकानामध्ये त्यांनी १८ वर्षे नोकरी केली. दुपारच्या वेळात दुकान बंद असताना सायकलला उदबत्तीचे पुडे लावून विकायचे आणि पैसे गावाकडे पाठवायचे. मंडईतील हरीभाऊ गानू यांनी ५१ रुपये घेऊन काळे यांना उदबत्ती बनविण्याचे तंत्र शिकविले. त्यानुसार ‘ए. व्ही. काळे यांची सुवासिक समर्थ उदबत्ती’ तयार करून दोन आणे आणि चार आणे या दराने पुडे विक्री करीत असत. खडतर परिश्रम घेत त्यांनी या व्यवसायामध्ये केवळ जम बसविला नाही तर, या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.