लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अमृत महोत्सवी वर्षात जनसंपर्क, समाजमाध्यमे, ब्रँडिंग चित्रफिती तयार करणे आदी कामांसाठी जनसंपर्क संस्था नियुक्त करण्यासाठीची निविदा विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. या कामासाठी दहा लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. मात्र, विद्यापीठाकडे जनसंपर्क आणि संबंधित कामांसाठीचे स्रोत आधीच उपलब्ध असताना आता स्वतंत्र संस्थेची नेमणूक करून निधीची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाचे अमृत महोत्सवी वर्ष फेब्रुवारीपासून सुरू झाले. मात्र, अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाल्यापासून विद्यापीठाने एकही कार्यक्रम आयोजित केलेला नाही. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता अमृत महोत्सवी वर्षात होणाऱ्या कार्यक्रमांना समाजमाध्यमांत प्रसिद्धी देणे, दृकश्राव्य साहित्य निर्मिती, विद्यापीठ गीतानुसार माहितीपट तयार करणे, जनसंपर्क आणि ब्रँडिंगच्या कामासाठी विद्यापीठाकडून जनसंपर्क संस्थेची नेमणूक करण्यासाठीची निविदा विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जनसंपर्क, दृकश्राव्य साहित्य निर्मिती, समाजमाध्यमांतील प्रसिद्धीचे काम वर्षभराचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, पत्रकारितेचे धडे देणारा जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट), दृकश्राव्य माध्यमाचे शिक्षण देणारा जनसंज्ञापन विभाग (डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन), माहितीपट तयार करण्यासाठी ईएमआरसी, तसेच जनसंपर्क विभागही विद्यापीठात कार्यरत आहे. असे असतानाही विद्यापीपाकडून जनसंपर्क आणि ब्रँडिगसाठी दहा लाखांचा खर्च खासगी संस्था नियुक्त करून केला जाणार आहे. त्यातही अमृत महोत्सवी वर्षाचे आता जेमतेम सहाच महिने बाकी आहेत. त्यामुळे सर्व स्रोत विद्यापीठाकडे उपलब्ध असताना आणि कमी कालावधी असताना दहा लाखांच्या निधीची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाने उपलब्ध स्रोतांचा आधी वापर करायला हवा. त्यानंतरही गरज निर्माण झाल्यास स्वतंत्र संस्थेची नेमणूक करण्याचा विचार केला पाहिजे. – प्रसेनजित फडणवीस, अधिसभा सदस्य