पुणे : मालमत्तेच्या वादातून अघोरी कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकासह सहाजणांविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याबाबत अनिकेत विनोद सुपेकर (वय २८, रा. जनवाडी) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कांता सुरेश चव्हाण (वय ७०), गिरीश सुरेश चव्हाण (वय ३५, दोघे रा. जनवाडी, गोखलेनगर), संगीता सुपेकर (वय ४५), स्वप्नील सुपेकर (वय २३), सोनल प्रवीण सुपेकर, तसेच मांत्रिक स्वप्नील भोकरे (तिघे रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत, त्याची आजी कांता चव्हाण हे जनवाडी भागात राहायला आहेत. अनिकेतच्या वडिलांनी दुसरा विवाह केला आहे. त्याची सावत्र आई कोथरुड भागात राहायला आहे. अनिकेतच्या पणजीच्या नावावर दोन खोल्या आहेत. मालमत्तेवरुन अनिकेत आणि आरोपींमध्ये वाद सुरू होते. अनिकेतच्या आईची साडी चोरीला गेली होती. अनिकेतने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा आजी कांता आणि परिसरातील एका तरुणीने साडी चोरल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> कंत्राटी पद्धतीने भरतीच्या विरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण

महिनाभरापूर्वी अनिकेत आजीच्या घरात गेला. तेव्हा अनिकेतची आई, काकू, मावशी यांची छायाचित्रे ठेवली होती. चोरलेल्या साडीजवळ टाचण्या लावलेले लिंबू ठेवले होते. मांत्रिक स्वप्नील भोकरे मंत्रोच्चार करत होता. अनिकेतने याप्रकाराबाबत विचारणा केली. तेव्हा आम्ही तुम्हाला मारुन टाकणार आहोत, अशी धमकी त्याला देण्यात आली. घाबरलेल्या अनिकेतने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A witchcraft through property disputes crime against six persons pune print news rbk 25 ysh
Show comments