पुणे: मोटारीवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बाजीराव रस्त्यावरील राणा प्रताप उद्यानासमोर मध्यरात्री घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला.
गुंजन दत्तात्रय सोनवणे (वय २५, रा. कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण शुभम गवांदे जखमी झाला आहे. याबाबत दिलीप पुरोहित (वय २१, रा. प्राधिकरण, निगडी) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक पुरोहित मध्यरात्री दोनच्या सुमारास बाजीराव रस्त्याने निघाला होता. त्यावेळी दुचाकीस्वार सोनवणे आणि त्याचा मित्र गवांदे भरधाव वेगाने निघाले होते.
हेही वाचा… अटक करायला आलेल्या पोलिसांवर श्वान सोडले, मुळशीत काय घडलं?
राणा प्रताप उद्यानासमोर भरधाव दुचाकी मोटारीवर आदळली. अपघातात सोनवणे गंभीर जखमी झाला. सोनवणे आणि त्याचा मित्र गवांदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच सोनवणेचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव तपास करत आहेत.