शिरूर : पुण्यातील काम सोडून गावाकडील शेती आणि जनावरे सांभाळण्याचे काम करावे लागणार असल्याच्या रागातून एकाने आपला सावत्र भाऊ आणि भावजयीवर चाकूहल्ला करीत डोक्यात लोखंडी डंबेल्स घातल्याने भावजय जागीच ठार झाली; तर भाऊ गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला. आंबळे (ता. शिरूर) येथे आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हा थरार घडला.
अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५) असे मृत झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात प्रियांका सुनील बेंद्रे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील बाळासाहेब बेंद्रे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे तिघेही उच्चशिक्षित असून, या घटनेने आंबळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाळासाहेब पोपट बेंद्रे (रा. अंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
हेही वाचा – रेल्वेचा धार्मिक पर्यटनावर भर; पुण्यातून २८ एप्रिलपासून भारत गौरव यात्रा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मृत अनिल बेंद्रे आणि जखमी सुनील बेंद्रे हे सावत्र भाऊ असून, दोघेही पुण्यात नोकरीस होते व तेथेच वास्तव्यास होते. पदवीधर असलेला अनिल हा खासगी कंपनीत नोकरीस होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सुनीलही खासगी कंपनीत नोकरीस होता. दारूचे व्यसन असलेला अनिल हा कुठल्याही एका कंपनीत टिकून काम करीत नसल्याने त्याला गावाकडे आणून शेती करायला द्यावी किंवा गोपालनाचा व्यवसाय सुरू करून द्यावा, असे सुनील यांनी सांगितल्याने फिर्यादी बाळासाहेब बेंद्रे यांनी त्याला १५ एप्रिल रोजी गावी आंबळे येथे आणले होते.
शेती करायची व गावी राहायची मानसिकता नसलेला अनिल परत पुण्याला जाण्यासाठी वडिलांकडे पैसे मागत होता व भांडत होता. सावत्र भाऊ सुनील याच्या सांगण्यावरूनच वडिलांनी आपल्याला गावी आणल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातच त्याने रविवारी (२३ एप्रिल) रागाच्या भरात घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून घरातील सर्व वस्तू टेबल, खूर्च्यांची मोडतोड केली होती. मात्र, कुटुंबीयांनी समजून सांगितल्यानंतर तो शांत झाला होता. दरम्यान, सोमवारी (२४ एप्रिल) रात्री सर्वांनी एकत्र जेवण करून गप्पा मारल्या. सुनील हे पत्नी प्रियांकासह घराच्या टेरेसवर झोपायला गेले; तर अनिल खालच्या खोलीत झोपला. फिर्यादी बाळासाहेब हे आई व पत्नीसह झोपले असताना पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना टेरेसवरून आरडाओरडा ऐकू आल्याने ते टेरेसवर गेले. तेव्हा अनिल हा सुनील यांच्यावर डंबेल्स ने हल्ला करीत होता.
बाळासाहेब हे मध्ये गेले असता त्याने त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी शेजारीच असलेल्या चुलत भावाला व त्याच्या मुलांना मदतीसाठी हाक मारली. ते सर्व मदतीसाठी धावले असता अनिल दुचाकीवरून पळून गेला. त्यावेळी प्रियांका या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या सर्वांगावर चाकूने भोसकल्याच्या खूणा होत्या.
हेही वाचा – पुणे : मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची तलवार उगारुन दहशत
दुचाकीवरून न्हावरेच्या दिशेने जात असताना आंबळेपासून जवळच अनिल बेंद्रे याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या मोटारीने धडक झाली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ ससून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर शिरूरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, सुनील उगले, सुजाता पाटील, एकनाथ पाटील, सहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.
इंग्लंडला जाण्याचे स्वप्न
सावत्र दीराच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या प्रियांका आणि जखमी झालेले त्यांचे पती सुनील बेंद्रे हे दोघेही आयटी इंजिनिअर असून, दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या या दांपत्याला लंडन येथील कंपनीत नोकरी मिळाली होती. आठ दिवसांनी ते लंडनला जाणार होते. नोकरीबरोबर तेथेच स्थायिक होण्याचा त्यांचा मानस होता. परदेशात गेल्यावर लवकर कुटुंबीयांना भेटता येणार नसल्याने खास भेटीगाठीसाठी ते चारच दिवसांपूर्वी गावी आंबळे येथे आले होते. परदेशवारीच्या निमीत्ताने हे दांपत्य आनंदात होते. पतीच्या सावत्र भावाच्या रुपाने काळाने त्यांच्यावर झडप घातली.