पुणे: शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या टपरीवर चहा पित थांबलेल्या तरुणाच्या डोक्यात झाडाची फांदी कोसळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
अभिजीत गुंड (वय ३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ चहाच्या टपऱ्या आहेत. अभिजीत रविवारी सायंकाळी मित्रांसोबत टपरीवर चहा पिण्यासाठी आला होता. त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने रविवारी सायंकाळी ओंकारेश्वर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अचानक झाडाची फांदी अभिजीतच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमी झालेल्या अभिजीतला नागरिकांनी तातडीने रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा… VIDEO: पुणे नगर रस्त्यावर टँकर उलटून वायुगळती
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून धोकादाय फांद्या तोडल्या जातात. तीन वर्षांपूर्वी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाजवळ झाडाची फांदी पडून एका अपंग महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी पाठपुरावा करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावेळी महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.