भेटवस्तू तसेच फुकटात परदेशवारीच्या आमिषाने एका पर्यटन कंपनीने नारायणगाव भागातील तरुणाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका कंपनीच्या संचालकांसह प्रतिनिधींच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीकडून अनेकांना गंडा घालण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणाने नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शेतकरी आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अफताफ इरफान पठाण, श्वेता वीरेंद्रकुमार जैस्वाल, स्नेहल वीरेंद्रकुमार जैस्वाल, संदीप रमेश गुप्ता, विजय चंद्रेपाल मेबाती (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चार महिन्यांपूर्वी आरोपींनी संपर्क साधला होता. अनतारा हाॅस्पिटलिटी कंपनीकडून नागरिकांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. कोणतेही शुल्क न आकारता परदेशात जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर तक्रारदार तरुण आणि त्याची पत्नी नारायणगाव परिसरातील एका हाॅटेलमध्ये गेले. तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधींनी देशात तसेच परदेशात पर्यटनाची संधी कंपनीकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आमिष त्यांना दाखविले.
त्याला ३० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्याचा मोबाइल क्रमांक घेतला. मोबाइलमधील सांकेतिक शब्द त्यांनी घेतला. एका कागदपत्रावर त्याची सही घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे लक्षात आले. ८ ऑगस्ट रोजी त्यांना नारायणगावमधील एका हाॅटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे त्याला संदीप गुप्ता आणि विजय मेबाती भेटले. त्यांनी रेड सिझन हाॅस्पिटिलटी कंपनीतील प्रतिनिधी असल्याचे सांगितले. कंपनीतील प्रतिनिधी श्वेता जैस्वाल, स्नेहल जैस्वाल, अफताफ पठाण तेथे होते. त्यांना परदेशातील पर्यटनाची माहिती देण्यात आली. अनतारा हाॅस्पिटिलटी आणि रेड सिझन कंपनी एकच असल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस पृथ्वीराज ताटे तपास करत आहेत.