पुणे : प्रवासी तरुणाला धमकावून रिक्षाचालक आणि साथीदारांनी सहा हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून रिक्षाचालकाने तरुणाला सोडण्याच्या बहाण्याने त्याला निर्जन ठिकाणी नेऊन लुटल्याचे उघडकीस आले आहे .याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका २० वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा चाकणचा आहे. तो कामानिमित्त सोमवारी (३० डिसेंबर) सकाळी सहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात आला. तेथून तो रिक्षाने जाणार होता. तुकाराम शिंदे वाहनतळाजवळ रिक्षाचालकाला त्याने इच्छितस्थळी सोडण्यास सांगितले. रिक्षाचालक आणि त्याच्याबरोबर साथीदार होता. तरुणाला रिक्षातून घेऊन त्याला निर्जन ठिकाणी नेले. त्याला शिवीगाळ, तसेच मारहाण करुन खिशातील १२०० रुपयांची रोकड काढून घेतली.
हेही वाचा >>>बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले
त्यानंतर रिक्षाचालकाने त्याच्याकडे आणखी पैसे मागितले. तरुणाला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने रिक्षाचालकाकडे चार हजार ९०० रुपये जमा केले. तरुणाला सोडून रिक्षाचालक साथीदारासह पसार झाला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कदम तपास करत आहेत. शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पादचाऱ्यांकडील मोबाइल संच, दागिने चोरून नेणे, धमकावून रोकड लुटणे अशा प्रकारचे १६७ हून जास्त गु्न्हे दाखल झाले आहेत.