पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर मित्राने केलेल्या छळाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बावधन येथे घडली. डॉ. शंतनु शरद चोप्रा (वय ३०, रा. संगमवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरुणी ही एका खासगी कंपनीत मनुष्यबळ अधिकारी म्हणून नोकरीला होती. चोप्रा हा पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात नोकरीला आहे. त्याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर तिला वारंवार मानसिक त्रास दिला. २३ सप्टेंबर रोजी त्याने फिर्यादी यांच्या मुलीला त्याच्यासोबत राहण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिच्याशी भांडण करून मध्यरात्री बारा वाजता तिला घराबाहेर काढले.

हेही वाचा – पोलीस आयुक्तांच्या बैठकीनंतर आठच दिवसात उद्योजकाकडे खंडणीची मागणी; चाकण एमआयडीसीतील प्रकार

हेही वाचा – पुणे : हरवेलेले मांजर शोधून देण्याचा बहाणा करून महिलेशी असभ्य वर्तन

तरुणीने आरोपीच्या हाता-पाया पडून एवढ्या रात्री कुठे जाऊ, असे विचारले. त्यावर त्याने कुठेही जाऊन मर, जीव दे, मला नको सांगू, असे म्हटले. या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने स्वतःच्या बावधान येथील घरी जाऊन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात डॉ. चोप्रा याच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर तपास करीत आहेत.