लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून संगणक अभियंता तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा शस्त्र बाळगणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. ती अविवाहित आहे.
हेही वाचा… महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आज पुण्यात देणार संभाजी भिडेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार
तरुणीने विवाहाविषयक माहिती एका संकेतस्थळावर दिली होती. त्यानंतर तरुणी आणि आरोपी याची विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. आरोपी हा तरुणीला बालेवाडी भागात भेटला. त्याने तरुणीकडे विवाहाबाबत विचारणा केली. त्यानंतर २४ जून रोजी संबंधित तरुण तरुणीला भेटला. तिला विवाहाचे आमिष दाखविले. बाणेरमधील एका हाॅटेलमध्ये तरुणीला तो घेऊन गेला. हाॅटेलमधील खोलीत त्याने तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याने तरुणीवर बलात्कार केला. त्याने तरुणीची माफी मागितली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे त्याने सांगितले.
महिनाभरानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी आरोपीने तरुणीला दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे तपास करत आहेत.