जेजुरी : श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पश्चिम बाजूला असलेल्या विष्णू पादुकाजवळ दर्शन घेताना जाणूनबुजून धक्का दिल्याचा आरोप करीत भाविकांच्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने कर्नाटक परिसरातून आलेल्या एका तरुण भाविकाला बेदम मारहाण केली. त्याच्या तोंडावर ठोसा लगावल्याने त्याचा दात पडला. हा प्रकार घटनास्थळी धाव घेऊन देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाची सुटका केली.
हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला. यावेळी आजूबाजूचे लोक ‘याची चूक काही नाही’ असे म्हणत होते. तरीसुद्धा या तरुणाला मारहाण करण्यात आली. कर्नाटक राज्यातून खंडोबा गडावर देवदर्शनासाठी हे कुटुंब आले होते, त्यांच्यातील तरुणाला मारहाण करत फरपटत नेण्यात आले. कर्मचारी व पुजाऱ्यांनी हा प्रकार थांबविला. संधीचा फायदा घेऊन मारहाण करणाऱ्या भाविकांचे टोळके गडावरून खाली निघून आले. गडावर काही काळ घबराटीचे वातावरण झाले होते. खंडोबा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक गणेश डीखळे, बाळासाहेब खोमणे, सतीश घाडगे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मारहाणीचा प्रकार थांबला. त्यानंतर विष्णू पादुकाजवळ लोखंडी जाळी उभी करून लांबून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली.