पुणे : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) दहा वर्षांपूर्वी काढलेल्या आधार कार्डांचे अद्ययावतीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ३० लाख नागरिकांचे आधार अद्ययावत करण्याचे बाकी होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या आधार अद्ययावतीकरणाच्या खास मोहिमेंतगर्त १५ हजार नागरिकांचे आधार अद्ययावत करण्यात आले आहे.
केंद्राकडून मार्च महिन्यात आधार अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत केवळ ४२२६ जणांनीच आधार अद्ययावत केले. त्यानंतर जिल्ह्यात २७६ आधार यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. त्याद्वारे शासकीय सुट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. परिणामी १ ते २२ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात १४ हजार ९६५ जणांनी आधार अद्ययावत केले.
हेही वाचा – पुणे : ग्रामीण भागातील बेकायदा जाहिरात फलक काढा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे विभाग स्तरावरही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून पाचही जिल्ह्यांमध्ये अपडेट करण्याचे काम जोमाने हाती घेण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याने यात आघाडी घेतली असून या जिल्ह्यात सर्वाधिक १७ हजार ५७० जणांनी आधार अद्ययावत केले आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक असून सर्वात कमी आधार अद्ययावतीकरणाचे काम कोल्हापुरात ७८०१ इतके झाले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुन्हा विशेष शिबिरांचे आयोजन
आधार अद्ययावत करण्याचे काम निरंतर सुरू असून दहा वर्षांपूर्वी आधार काढलेल्या नागरिकांनी आधार अद्ययावत करून घेण्याचे आवाहन आधारच्या जिल्हा समन्वयक अधिकारी रोहिणी आखाडे यांनी केले. २९, ३० एप्रिल आणि १ मे रोजी आधार अद्ययावत करण्याचे खास शिबीर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजणार; जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू
पुणे विभागाचा आधार अद्ययावतीकरणाचा आढावा
सातारा १७,५७०
पुणे १४,९६५
सांगली ९,२५२
सोलापूर ८,११९
कोल्हापूर ७,८०१