पुणे : मोदी सरकारकडून विरोधी पक्षांवर केली जाणारी कारवाई, वाढता भ्रष्टाचार, घटनाविरोधी कामकाज या विरोधात आम आदमी पक्षातर्फे अकरा भाषांमध्ये मोदी हटवा देश वाचवा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यातही जनजागृही अभियान राबवले जाणार आहे. पक्षाचे पुणे जिल्हा संघटक मंत्री डॉ. अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत या वेळी उपस्थित होते.
मोदी सरकार भांडवलदारांना मोठे करू पाहात आहे. पेट्रोल आणि सीएनजीचे दर आता एकच झाले आहेत. विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर करण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाई हे सूडबुद्धीचे राजकारण आहे. मात्र अदानीं या प्रिय मित्राबाबत पंतप्रधान मोदी गप्प आहेत. त्यामुळे हुकुमशाही सरकारविरोधात देशभरात मोदी हटवा देश वाचवा मोहीम हाती घेण्यात आल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.