पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या निर्णयानुसार आपचे उमेदवार किरण कद्रे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरला होता.
हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक : सचिन अहीर यांनी घेतली बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची भेट; म्हणाले, “आज…”
दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उत्तम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्येही याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल राज्यातील जनतेमध्ये लवकरच येतील आणि याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल. सध्या आम आदमी पक्षाने विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जोमाने लढवणार असल्याचे आपकडून सांगण्यात आले.