पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकीय पक्षांचे नेते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत प्रामुख्याने होत असली तरी इतर राजकीय पक्षांनी तसेच काही अपक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने अनेक मतदारसंघातील निवडणुकीत रंगतदार झाली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरांचे ग्रहण देखील लागले आहे. काही मतदारसंघातील बंडखोरी थोविण्यासाठी महायुतीला यश आले असले तरी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीला आपल्या बंडखोरांना शांत करण्यामध्ये अपयश आले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले आणि महायुतीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी अनेक छोटे-मोठे पक्ष एकत्रित येऊन काम करत आहे. मात्र महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या बंडखोरीमुळे काही हक्काच्या जागांवर पराभव होण्याची वेळ आली असल्याची टीका आम आदमी पक्षाने (आप) केली आहे. काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरी वरून आपने काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना खडे बोल देखील सुनावले आहेत.
हेही वाचा >>> विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे ‘जोशाबा समतापत्र’ प्रसिद्ध, नक्की काय म्हंटले त्यात !
विधानसभेच्या निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आम आदमी पक्षाने (आप) निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुणे शहरातील तीन मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीच आव्हान उभे केले आहे. पक्षातील ही बंडखोरी शमविण्यामध्ये काँग्रेस नेते अपयशी ठरले, ही राजकीय शोकांतिका आहे, अशी टीका ‘आप’ने केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारच्या हुकूमशाही, मनमानी धोरणांचा विरोध म्हणून ‘आप’ने राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नव्हते. हरियाणा येथील अनुभवावरून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्येदेखील मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी ‘आप’ने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मात्र, असे असताना काँग्रेसला त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना बंडखोर होण्यापासून रोखता आले नाही, ही मोठी दुर्दैवी गोष्ट असल्याची टीका ‘आप’चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.