येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तसाठी प्रसिद्ध अभिनेता अमीर खान याने त्याच्या प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या ‘पीके’ चित्रपटाचा खास शो कारागृहात दाखविण्यासाठी सुरू केलेला खाटाटोप कारागृह प्रशासनाने हाणून पाडला आहे. या चित्रपटात संजय दत्तने अमीरच्या मित्राची भूमिका केली असून, प्रत्यक्षातही ही मैत्री निभावण्यासाठी हा खाटाटोप सुरू केला होता. मात्र, येथे कोणीही ‘स्पेशल’ नसल्याचे स्पष्ट करीत कारागृह प्रशासनाने या खास शोचे मनसुबे उधळून लावले.
येरवडा कारागृहात ‘पीके’ चा खास शो होण्यासाठी या चित्रपटाची टीम प्रयत्नशील होती. नोयडा येथे रविवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमीर याने या स्पेशल शो बाबत वक्तव्यही केले. ‘पीके’ मध्ये अमीरसोबत संजय दत्तने काम केले आहे. शिक्षा होण्यापूर्वीच संजय दत्तने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. आता चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मात्र, संजय दत्त हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. अशा वेळी त्याला चित्रपट पाहणे शक्य होणार नसल्याने या मित्रासाठी चित्रपटाचा खास शो थेट कारागृहात दाखविण्यासाठी अमीरचे प्रयत्न होते.
कारागृहात चित्रपट दाखविण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचेही अमीरने जाहीर केले होते. त्याने याबाबत अद्याप कोणाची भेट घेतली नव्हती. मात्र, त्यापूर्वीच कारागृहाच्या प्रशासनाने भूमिका स्पष्ट करून अमीरच्या प्रयत्नांना ब्रेक लावला.
राज्याच्या कारागृह प्रमुख व अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी याबाबत सांगितले, ‘‘चित्रपटाच्या खास शोबाबत मलाही नुकतेच समजले आहे. कारागृहात आमच्यासाठी कोणीही ‘स्पेशल’ नाही. येथे सगळे कैदी एकसारखेच आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने कोणालाही खास वागणूक देण्याचा प्रश्नच नाही. कारागृहाच्या नियमावलीप्रमाणे आम्ही काम करीत असतो.’’ 

Story img Loader