शिवसेनेची ‘रणरागिणी’ नगरसेविका सीमा सावळे आता लेखिका बनल्या आहेत. पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचाराची त्यांनी उघडकीस आणलेल्या जवळपास २५ प्रकरणांची र्सवकष माहिती असलेल्या ‘अंकुश’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांच्या हस्ते चिंचवडला समारंभपूर्वक होत आहे.
पिंपरी पालिकेतील टीडीआर घोटाळा, दोन पूररेषा, बीआरटीएस, सिटी सेंटर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, बचत गट अनुदान, ताथवडे विकास आराखडा आदी प्रकरणांमधील सावळा गोंधळ सीमा सावळे व सारंग कामतेकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून उजेडात आणला. वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागितली. त्याची वृत्तपत्रांमध्ये भरपूर चर्चा झाली. सत्तारूढ राष्ट्रवादीचे नेते अडचणीतही आले. दुसरीकडे, या प्रकरणांचा अपेक्षित पाठपुरावा झाला नाही, असेही बोलले जाते. एकेक प्रकरण उघडकीस आणले जात असताना पूर्वी काढलेल्या प्रकरणांची चर्चा होत नव्हती. त्यामुळे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ असे चित्र पुढे आले होते. या सर्व शंका-कुशंकांना उत्तरे देत आपल्याला आलेल्या अनुभवांची माहिती सर्वाना व्हावी, यासाठी सावळेंनी पुस्तक लिहिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाचला रामकृष्ण मोरे नाटय़गृहात होणाऱ्या प्रकाशनास संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर, डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर उपस्थित राहणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा