लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्या वेळचे किंवा तातडीचे म्हणून काही विषय मंजूर केले जातात. मात्र त्याची माहिती सार्वजनिक केली जात नाही. या विषयांची माहिती संकेतस्थळावरही दिली जात नाही, अशी तक्रार आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे कुंभार यांनी तक्रार केली आहे. मंजूर केलेल्या विषयांची माहिती संकेतस्थळावर न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आणखी वाचा-‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना

मंत्रिमंडळात आयत्या वेळचे ठराव तातडीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मांडायचे असतात. ठराव मंजूर झाल्यानंतर त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देणे आवश्यक आहे. मात्र ही माहिती संकेतस्थळावर देणे लांबच राहिले असून, माहिती अधिकारात मागितल्यानंतरही ही माहिती विस्तृत स्वरूपाची आहे, असे सांगून ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे कुंभार यांनी या तक्रारीत नमूद केले आहे.

गेल्या पाच वर्षांत मंत्रिमंडळाच्या २०९ बैठका झाल्या. त्यांची माहिती संकेतस्थळावर आहे. मात्र, आयत्या वेळच्या ठरावाची माहिती लपविण्याचे किंवा ती सार्वजनिक न करण्याचे कारण काय, अतिरिक्त कार्यसूची तयार असताना माहिती सार्वजनिक का केली जात नाही, अशी विचारणा कुंभार यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap demand for action against officials who not provide information on website about proposals approved during cabinet meeting pune print news apk13 mrj